बरांज कोळसा खाणीतील कामगार व प्रकल्पग्रस्तांना अटक व सुटका

0
278

भद्रावती (चंद्रपूर) : बरांज कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्त व आंदोलकांना बरांज (मो.) ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत पायदळ वारी दरम्यान अटक करण्यात आली व जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचवून निवेदन देण्यात आले त्यानंतर आंदोलकांना घरी सोडण्यात आले.
बरांज कोळसा खाणीतील कोणत्याही प्रकारचे काम चालू करण्याआधी प्रकल्पबाधित गावक-यांच्या व तेथील कामगारांच्या मागण्यांचे निराकरण करण्याबाबतचे निवेदन घेवुन आज (दि.29) ला प्रकल्पग्रस्त व कामगारांनी सकाळी 9:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायदळ वारी सुरु केली.
जमावबंदीचे उल्लन्घन केले असल्याचा आरोप ठेवून आंदोलकांना ताडाळी जवळ अटक करण्यात आली. मात्र आंदोलकांनी आम्हाला जेलमधे टाका आम्ही अन्नत्याग करु अशी भुमिका घेताच, त्यांना शासकीय पोलिस वाहनात बसवून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचविण्यात आले. तिथे आंदोलकांनी जिल्हाधिकारींना निवेदन दिले. त्यानंतर आंदोलकांना भद्रावती पर्यंत सोडण्यात आले.
कामगार व प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी व खासदार यांना याअगोदर निवेदन दिले होते. मात्र कंपणीकडून कामगार व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्याबाबत कोणत्याच हालचाली झाल्या नाही. जिल्हाधिकारी देखील कंपणी व कामगार तथा प्रकल्पग्रस्त यांच्यात मध्यस्थी करण्यास कमी पडत आहेत. परीणामी कामगार व प्रकल्पग्रस्त हे बेरोजगारीमुळे कुठल्याही साधनांकरीता आर्थिक खर्च करु शकत नाही. त्यामुळे कामगार व प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता पायदळवारीचा निर्णय घेतला.
बरांज स्थित कर्नाटका एम्टा कोळसा खाण ही 31 मार्च 2015 पासून बंद झाली. ती आता प्रत्यक्ष स्वरुपात सुरु होण्याच्या हालचाली खाण परीसरात सुरु आहे. मात्र कोळसा खाण घोटाळ्यानंतर सध्या या खाणीचा मुळ मालक कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमीटेड हा आहे. परंतु कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमीटेड या कंपणीकडून अजून पर्यंत तेथील प्रकल्पबाधित गावातील गावक-यांच्या व खाणीतील कामगारांच्या समस्या सोडविलेल्या नाही.
बरांज खुली कोळसा खाणीतील आधीच्या प्रकल्पग्रस्त कामगारांना कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमीटेड कंपणीच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी नौकरी देण्यात यावी, खाण बंद झाली तेव्हापासून म्हणजे 1 एप्रिल 2015 पासून कामगार बेरोजगार झाला असुन तेव्हापासून कामगारांचे थकित वेतन दयावे, खाण सुरु होण्याअगोदर सीएमपीएफ खात्यात कामगारांचे भविष्य निर्वाह निधी जमा करण्यात यावे, बरांज (मोकासा) व चेकबरांज (मानोरा) या दोनही प्रकल्पबाधित गावांचे खाण सुरु करण्याअगोदर पुनर्वसन करण्यात यावे, महाराष्ट्र शासन व कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमीटेड यांच्यामधे 15 जानेवारी 2016 मधे झालेल्या पुनर्वसन पॉलीसीमधे खाण सुरु होण्याच्या आधी सुधारणा करण्यात यावी, प्रकल्पबाधीत गावातील भुसंपादन केलेल्या शेतकरी किंवा त्यांच्या मुलांना कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमीटेड कंपणीच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी नौकरीमधे खाण सुरु होण्याआधी सामावून घ्यावे, व बरांज (मोकासा) व चेकबरांज (मानोरा) या दोनही प्रकल्पबाधीत गावातील उर्वरीत शेतजमीन भुसंपादीत करण्यात यावी, आदी मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहे.
यासंबधाने जिल्हाधिकारी कार्यालयात कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमीटेड कंपणीसोबत बैठक लावण्याची मागणी देखील खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे प्रकल्पग्रस्त व कामगारांनी केलेली होती. मात्र सदर बैठक अद्याप लागली नाही.
यात कामगार नेते राजु डोंगे, रामदास मत्ते, दिनेश वानखेडे, राजगोपाल जयरामन, संजय ढाकणे, प्रभाकर कुळमेथे, व इतर कामगार तथा प्रकल्पग्रस्त आदींचा समावेश होता.

◾पंचायत समितीचे सभापती प्रविण ठेंगणे हे सुरवातीला या पायदळ वारीत सहभागी झाले होते, मात्र घोडपेठ येथून ते पायदळवारीतून निघून गेले व नंतर खासगी वाहनाने येवून पुन्हा आंदोलनात सहभागी झाले.

◾पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे पायदळवारी सुरु असतांना चंद्रपुरच्या दिशेने बाजुनेच गेले पन आंदोलनाची दखल घेतली नाही, किंवा थांबले नाही, असे आंदोलकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here