चंद्रपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरोना काळात तसेच गंभीर परिस्थितीत रुग्णाला कमीतकमी वेळेत दवाखान्यात पोहचविण्यासाठी व तातडीचे उपचार मिळण्यासाठी लाईफ सपोर्टची पुर्ण व्यवस्था असलेल्या 38 अद्यावत रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामुळे चंद्रपुर जिल्हा हा राज्यात पुण्यानंतर सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला जिल्हा ठरला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन परीसरात या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, उपविभागिय अधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्याच्या खनिज विकास निधीतून सर्व सुविधायुक्त 38 रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहीका वातानुकुलीत असून अत्यावश्यक सोईसुविधांनी सुसज्ज आहेत. या रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणार आहेत. याशिवाय सहा रुग्णवाहीका वैद्यकीय महाविद्यालयास देण्यात येणार आहेत. जिल्हाभरात हेल्थ मिशन राबविणे व ग्रामीण पातळीपर्यंत आरोग्य यंत्रणा अद्यावत करण्याचा मानस असल्याचे ना. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.